
सोनई, ता. 24 ः नेवासा तालुक्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तांतर झाले. आमदार बदलण्याची पद्धत नेवासेकरांनी कायम ठेवली. 2019 ला अपक्ष लढून आमदार झालेल्या व त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे मंत्रीपद मिळविणाऱ्या शंकरराव गडाखांचा पराभव झाला. याच निवडणुकीत अपक्ष लढलेल्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचाही पराभव झाला. गेल्या दोन वेळा आमदार होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या, शिवसेना शिंदे गटाच्या विठ्ठलराव लंघे यांचा विजय झाला. आता हे तिन्ही नेते पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
आगामी दोन-तीन महिन्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणुका होणार आहेत. शिवाय नेवासा नगरपंचायतीची निवडणुकीही होणार आहे. या तीन महत्त्वाच्या निवडणुकानंतर नेवासा तालुक्यातील काही महत्त्वाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही होणार आहेत. या सर्व निवडणुकीत लंघे, गडाख व मुरकुटे हे तालुक्यातील तिन्ही महत्त्वाचे नेते आपली ताकद पुन्हा एकदा आजमावणार आहेत. माजीमंत्री शंकरराव गडाख हे आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेले दिसत आहेत. तालुक्यात विविध गावांत भेटी देऊन गडाखांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुकल्याचे दिसत आहे. त्यांच्या सोबतीला त्यांच्या पत्नी सुनीता गडाख, भाऊ सुनील गडाख व पुत्र उदयन गडाख यांनीही भेटी व कार्यक्रमांना हजेरी लावण्यासा सुरुवात केली आहे.
मुरकुटे बॅकफुटला
दुसरीकडे, आ. विठ्ठलराव लंघे हेही आपला विजय हा केवळ योगायोग नव्हता हे दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. आ. लंघे यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाची ताकद व भाजपची ताकदही दिसत आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे, ज्येष्ठ नेते किसनराव गडाख, युवा नेते सचिन देसर्डा आदी महायुतीचे कार्यकर्तेही आगामी निवडणुकांच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे. या दोन्ही नेत्यांच्या तुलनेत गेल्यावेळी अपक्ष लढलेले माजी आ. बाळासाहेब मुरकुटे हे मात्र काहीसे साशंक दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपमध्ये पुन्हा येतील, अशा चर्चा होत्या. परंतु स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना विरोध पाहता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तालुक्यात खरी लढत लंघे-गडाख यांच्यातच होण्याची चिन्हे दिसत आहे.
कुठे रंगणार लढती?
बेलपिंपळगाव गट, कुकाणे गट, भेंडे बुद्रुक गट, भानसहिवरे गट, सोनई गट, खरवंडी गट, चांदे गट या जिल्हा परिषदेच्या गटांत तुल्यबल लढतीची शक्यता आहे. याशिवाय 14 गणांतही लंघे-गडाख गटांत चुरशीच्या लढती होतील.
कुणाचे पारडे जड?
जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीच्या 14 गणांत तुल्यबल लढती होतील. गेल्यावेळी तालुक्यावर माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व राहिले होते. त्यांचे बंधू सुनील गडाख हे जिल्हा परिषदेचे सदस्य व त्यानंतर सभापतीही झाले होते. परंतु आता विधानसभेची गणिते बदलल्यामुळे आ. विठ्ठल लंघे यांनीही व्यूव्हरचना केली आहे. सर्व गट व गणांत तुल्यबल उमेदवार देण्याची तयारी महायुतीने केली आहे.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.