शनिशिंगणापूर अ‍ॅप घोटाळा : फक्त ‘त्या’ दोघांना बळीचा बकरा करुन प्रकरण दडपले जाईल का ?

सोनई, ता. 2ः कोट्यवधींचा अ‍ॅप घोटाळा उघडकीस आल्यापासून शनिशिंगणापूर चांगलेच चर्चेत आले आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर एक कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकारानंतर ते दोन कर्मचारी कोण? अशा चर्चा सुरु झाल्या. परंतु फक्त एक कोटींचा खुलाशापुढे हा तपास जाईल का, हा प्रश्न होऊ लागला आहे.

देवस्थानच्या दोन कर्मचार्‍यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल एक कोटी रूपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही रक्कम अधिकृत परवानगी असलेल्या आणि बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्राप्त झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या रकमेचा पुढील प्रवास नेमका कुठे झाला, कुणाच्या खात्यात ही रक्कम वाटली गेली, याचा शोध सध्या सुरु आहे. या अ‍ॅप घोटाळ्यात दर्शन, अभिषेक व इतर सेवांसाठी भाविकांकडून 500 ते 5 हजार रूपयांपर्यंत रकमा आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

इतर देवस्थानतही फ्राँड?

शनिशिंगणापूरच्या ‘बहाद्दरांनी’ फक्त शनिशिंगणापूर देवस्थानातच अफरातफर केलेली नाही. तर अयोध्या, वैष्णोदेवी, शिर्डी अशा इतर देवस्थानातही भक्तांना सेवा पुरविली जाईल, असे या अ‍ॅपमधून दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी इतर सर्व देवस्थानशी पत्रव्यवहार करुन या अ‍ॅपचा तपास सुरु केला आहे. पोलिसांची शंका खरी ठरली, तर हा घोटाळा काही हजार कोटीचा असेल असे सांगितले जात आहे.

अ‍ॅप नेमके किती?

देवस्थानकडून फक्त तीन अ‍ॅप्सना अधिकृत परवानगी देण्यात आली होती. परंतु तपासात चार अनधिकृत अ‍ॅप्स कार्यरत असल्याचे समोर आले. आणखी अ‍ॅप्स कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून देवस्थानच्या अधिकृत खात्यावर रक्कम जमा झाल्याचे पुरावे सध्या तरी उपलब्ध नाहीत. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांना दोन वेळा चौकशीसाठी बोलावून माहिती मागवण्यात आली. मात्र, अद्याप त्यांनी कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.

अ‍ॅप घोटाळा दडपतोय का?

हा अ‍ॅप घोटाळा दडपला जातोय, अशी चर्चा अगदी पहिल्या दिवसांपासून सुरु आहे. शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये घोटाळा होतोय, हा आरोप गेल्या 10-15 वर्षांपासून होत आहे. परंतु प्रत्येक वेळी विश्वस्त मंडळाला क्लिन चीट दिली जातेय. यावेळी तपास पुढे गेलाय. विश्वस्त मंडळ बरखास्त झालेय. परंतु आत्तापर्यंत फक्त एक कोटींची रक्कम जमा झाल्याचे, सांगून फक्त दोन कर्मचारी दोषी असल्याचे सांगण्यात आलेय. त्यामुळे फक्त दोघांना बळीचा बकरा करुन हे प्रकरण गुंडाळले जाईल का? हा प्रश्न शनिभक्तांना पडला आहे.

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अश्याच नव नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *