शनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, उपोषण सुटले…..

सोनई, ता. 5ः शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेले उपोषण अखेर सुटले. कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची रक्कम फरकासह देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. शनैश्वर देवस्थानचे विश्वस्त व भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी यासाठी मध्यस्थी केली. हे उपोषण दोन दिवस चालले.

2024 साली देवस्थानने सहावा वेतन आयोग स्विकारला होता. परंतु त्यावरील त्रुटींवर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याने तो कर्मचाऱ्यांना लागू झालेला नव्हता. एक वर्षानंतरही सहाव्या वेतन आयोगाबाबत चालढकल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर येथील कायम असलेल्या कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. शनिभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून, कामगारांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. ड्यूटीवर असलेले कर्मचारी कामावर व ड्यूटी संपलेले कर्मचारी उपोषणाला, या पद्धतीने उपोषण करण्यात आले. रविवारी विश्वस्त मंडळ व कर्मचारी यांच्यात बैठक झाली. परंतु त्यावर तोडगा निघाला नाही. अखेर उपोषण सुरु झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा विश्वस्त मंडळाने उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यात महागाई भत्ता 13 टक्के वाढवून एकूण 155 टक्के महागाई भत्ता देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

शनैश्वर कामगार युनिअनचे अध्यक्ष श्यामसुंदर शिंदे तसेच इतर कर्मचाऱ्यांना विश्वस्त पोपट कुऱ्हाट, शिवाजी दरंदले, बाळासाहेब बोरुडे यांनी लिंबू शरबत दिले. भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांचीही या प्रकरणात यशस्वी भूमिका राहिली.

इन्फॉर्मर मराठी :-

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :-
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अश्याच नव-नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *