अॅप घोटाळा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात; याचिका दाखल झाल्यानंतर हालचाली वाढल्या……..

सोनई, ता. 25 – शनैश्वर देवस्थानमधील घोटाळ्यांची साडेसाती आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन दरंदले यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात 54808/2025 या क्रमांकाने ती दाखल केली. शनैश्वर देवस्थानमधील बहुचर्चित घोटाळा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा होत असून या संपूर्ण प्रकरणाची ईडी व सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

शनैश्वर देवस्थानमधील ऑनलाईन अॅप व क्यूआर कोड घोटाळा सध्या गाजत आहे. काही विश्वस्त, कर्मचारी व त्रयस्त लोकांनी हा घोटाळा केला असून तो सुमारे 500 कोटींपेक्षा मोठा असल्याचा आरोप होत आहे. घोटाळ्याची हीच व्याप्ती पाहता, ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती सचिन दरंदले यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या घोटाळ्याची चौकशी ईडी व सीबीआय मार्फत करावी, केंद्रीय कमिटीकडून देवस्थानचे मागील 10 वर्षांचे ऑडीट करावे आणि देवस्थान ट्रस्ट बरखास्त करुन शनैश्वर देवस्थान कायदा 2018 लागू करावा, अशा महत्त्वाच्या मागण्या या याचिकेद्वारे करण्यात आल्या आहेत. देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्याचा निर्णय हा आपण याचिका दाखल केल्यानंतरच झाला, असा दावाही दरंदले यांनी केला आहे. मात्र आता ट्रस्ट बरखास्त करण्याचे श्रेय दुसरेच घेत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या याचिकेबाबत माहिती देताना दरंदले यांनी सांगितले आहे की, ही याचिका अॅड. अरविंद अँण्ड असोसिएट्स यांच्यामार्फत दाखल करण्यात आली आहे. साधारणतः पुढील एक महिन्यानंतर या याचिकेची पुढची तारीख मिळणार आहे. ही याचिका 19 तारखेलाच दाखल होणार होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ती दाखल होऊ शकली नाही. त्यानंतर 22 तारखेला ती दाखल करण्यात आली. त्याच दिवशी सायंकाळी ट्रस्ट बरखास्त करण्यात आल्याचे, सरकारकडून जाहीर करण्यात आले. आता धर्मादाय आयुक्तांकडूनही या प्रकरणाची तातडीने दखल घेतली जाईल व आरोपींना पुढील दोन-चार दिवसांत अटक होईल, अशी अपेक्षाही दरंदले यांनी व्यक्त केली.

चौकट 1
बडे मासे हाती लागणार
या प्रकरणाची चौकशी ईडी व सीबीआय कडून करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. शिवाय या देवस्थानचे मागील 10 वर्षांतील ऑडीट केंद्रीय समितीकडून करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे हा घोटाळा दाबला जाण्याची शक्यता कमी झाली आहे. बनावट क्यूआर कोड, बनावट देणगी पुस्तक व बनावट अॅप घोटाळ्याचा तपास ईडी व सीबीआयकडून झाल्यास अनेक बडे मासे त्यात हाती लागतील, अशा चर्चा आता रंगल्या आहेत.

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *