शनिशिंगणापूर घोटाळा ः घोटाळ्यांसाठी पुरावे कशाला? दिसतंय ते तपासा ना…

सोनई, ता. 9 ः शनिशिंगणापूर आणि घोटाळे हे जणू समिकरणच झालं आहे. अॅप, बनावट पावत्या व क्युआर कोड हा घोटाळा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालय व पोलिसांत याबाबत तक्रारी केल्यानंतर, हा कोट्यवधींचा घोटाळा जास्त चर्चेत आलाय. रविवारी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी शनिशिंगणापूरला येऊन विश्वस्त मंडळाशी याबाबत चर्चा केली. परंतु हा प्रकार दिसतो तेवढा सोप्पा नक्कीच नाही. एक साखळीच यामागे असल्याचे सांगितले जातेय.

जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी रविवारी शनिशिंगणापूरला भेट दिली. शनैश्वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत शनैश्वर देवस्थानने दाखल केलेल्या तीन बनावट अॅपची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन एसपींनी दिले. आता यात गंमत अशी आहे की, देवस्थानने ज्या तीन अॅपविरोधात तक्रारी दिल्यात, ते अॅप कोलकत्ता, नवी दिल्ली येथील आहेत. ऑनलाईन पुजा, तेल अर्पण करणे किंवा शनिमुर्तीचे दर्शन घडवून आणणे याबाबत या अॅपने देवस्थानची फसवणूक केली, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परंतु काँग्रेस, भाजप किंवा अन्य शनिभक्तांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारी वेगळ्या आहेत. केवळ तीन अॅप नसून, सात ते आठ अॅप आहेत व ते देवस्थानचे कर्मचारी व अधिकारी यांच्या संगनमताने सुरु आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.

आता हे प्रकरण गंभीर आहे. यात पुजारी, कर्मचारी यांची साखळी आहे, असा दावा काही तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. एका पुजाऱ्याच्या पाहुण्याचाही यात हात आहे, असे सांगितले जात आहे. वास्तविकपणे पुजारी हा शनैश्वर देवस्थानमध्ये कायम चर्चेत राहणारा घटक आहे. सोनई किंवा परिसरातून काही पुजारी शनैश्वर देवस्थानमध्ये पुजाविधी करतात. आता या पुजाऱ्यांच्या लाईफस्टाईलचा विचार केला, तर अनेकदा धक्का बसतो. कोट्यवधींचे बंगले, महागड्या गाड्या आणि राजा- महाजाराजांसारखी लाईफस्टाईल असणारे काही पुजारी, सध्या सोनई परिसरात चर्चेत आले आहेत. देवस्थान यांना किती पैसे देते व ते किती पैसे कमावतात, याच्या हिशोब सध्या सुरु आहे. एका वृत्तपत्रात पुजाऱ्याने त्याची बाजू मांडताना देवस्थान परिसरातील सर्व विधी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होतात, असा दावा केला होता. पुजा करणारा प्रत्येक भाविक, उद्योगपती हा पुजेनंतरची ‘दक्षिणा’ पुजेच्या ताटात टाकतो. त्यासाठी स्वतंत्र दानपेटीची सुविधा नसते, हेही तितकेच खरे आहे. हे पुजारी कित्येक वर्षांपासून शनिमंदीरात सेवा देत असल्याने, देश-विदेशातील अनेक बड्या उद्योगपतींचे त्यांच्याशी त्यांचे थेट संबंध आहेत. हेच देश-विदेशातील अब्जाधीश भाविक त्यांचे अनेक विधी हे परस्पर फोनद्वारे संपर्क करुन करत नसतील का, हाही प्रश्न आहे. मग केलेल्या याच पुजाविधीची कल्पना देवस्थानला आहे का? असेल तर त्या बदल्यात देवस्थानमध्ये किती पैसे जमा झाले? हे प्रश्न समोर आले आहेत.

चौकट
पुजाऱ्यांची फोनची सीडीआर तपासावी

देश विदेशातील अनेक भाविक काही पुजाऱ्यांशी फोनवरुन थेट संपर्क साधत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. या भाविकांच्या पुजांची माहिती देवस्थानला आहे का? असेल तर त्या पुजेच्या माध्यमातून मिळालेली देणगी किती आहे? हे प्रश्न सध्या विचारले जात आहेत. या पुजाऱ्यांच्या फोनचा सीडीआर काढून आत्तापर्यंत केलेल्या पुजाविधीची आकडेवारी काढावी, व या सर्व प्रकरणाचा सीबीआय तपास व्हावा, अशी मागणी सध्या जोर धरु लागली आहे.

या प्रश्नाची हवीत उत्तरे

  • देवस्थानच्या पुजाऱ्यांना पगार असतो का? असेल तो पुजाविधीप्रमाणे दिला जातो की, महिन्याला ठरवून दिला जातो?
  • पुजा किंवा अभिषेकानंतर ताटात टाकली जाणारी दक्षिणा ही पुजाऱ्याची असते की देवस्थानची?
  • पुजाऱ्यांना देवस्थानकडून पगार नसेल, ते त्यांची गुजराण कशी करतात?
  • पुजाऱ्यांना देवस्थानकडून पगार असेल, तर दक्षिणा म्हणून मिळालेल्या दिवसाला मिळणाऱ्या शेकडो किंवा हजारो रुपयांचा हिशोब देवस्थानकडे आहे का?
  • पुजाऱ्यांचा या बेहिशोबी मालमत्तेचा टॅक्स त्यांनी सरकारजमा केला आहे का?
  • पुजाऱ्यांना ठेवण्यासाठी देवस्थानच्या नेमक्या काय अटी व शर्ती आहेत?
  • पुजाऱ्यांच्या उच्चभ्रू जीवनशैलीकडे देवस्थान समितीचे लक्ष का गेले नाही?
  • पुजाऱ्यांची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे किंवा सरकारकडे नोंदणी केली आहे का?
  • पुजाऱ्यांचे अनेक देश-विदेशातील बड्या भाविकांशी संबंध आहेत. जर एखाद्या भाविकाने फोनवर साडेसातीचा विधी केला असेल तर त्या बदल्यात मिळणारे लाखो रुपये दक्षिणा देवस्थानला माहित आहे का?

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *