
सोनई, ता. 5 ः प्रत्येक सजीवांच्या कर्माचा न्यायाधिश समजल्या जाणाऱ्या शनी महाराजांच्या दरबारात, कोट्यवधींचा घोटाळा झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. देवस्थानशी संबंधीत असणाऱ्या काही महाभागांनी, देवस्थानच्या नावाने बनावट अॅप तयार केले. त्यातून सुमारे 300 ते 400 कोटींची माया जमविली, असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या गंभीर प्रकाराबाबत आ. विठ्ठल लंघे यांनी संताप व्यक्त करत, हा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचे सांगितले. दरम्यान, या गंभीर प्रकाराबाबत तालुक्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांची भूमिका मात्र गुलदस्त्यात असल्याने, आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
काय म्हणाले आमदार लंघे?
या गंभीर प्रकाराबाबत आ. विठ्ठल लंघे यांनी एका न्यूज चॅनलला नुकतीच प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, या देवस्थानमध्ये नोकरी करत असलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देवस्थानच्या नावाने बनावट ॲप तयार करुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे. यामध्ये जे जे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असतील व पोलिस तपासात ज्यांच्याविरुद्ध पुरावे मिळतील त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. कुणालाही या प्रकरणात पाठीशी घातले जाणार नाही.
गडाखांनाही लगावला टोला
या घोटाळ्याबाबत आ. लंघे यांनी माजी आमदार शंकरराव गडाख यांचे नाव न घेता त्यांनाही टोला लगावला. लंघे म्हणाले की, ‘ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या देवस्थानचा कारभार चालतो, ते या घोटाळ्यापासून अनभिज्ञ कसे? हाच मोठा प्रश्न आहे. सुदैवाने या घोटाळ्याच्या संदर्भात पोलीस प्रशासनासह धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. विधानसभेत या विषयाचे पडसाद नक्कीच उमटतील. शनिभक्तांच्या श्रद्धेची थट्टा करणाऱ्यांना शनिदेव कधीच माफ करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या कानावरही हा विषय घातला जाईल, असेही लंघे यांनी स्पष्ट केले.
सायबर विभागाकडून तपास सुरु
शनिशिंगणापूर बनावट ॲप घोटाळ्यासंदर्भात पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले होते. हा अर्ज आता तपासासाठी सायबर विभागाकडे पाठविला असल्याची माहिती, देण्यात आली आहे. शिवाय धर्मादाय आयुक्त कार्यालयानेही या घोटाळ्याची गंभीर दखल घेतली असून, त्यांच्याकडूनही चौकशी सुरु झाल्याचे समजते. या प्रकरणात काही कर्मचारी व मोठे अधिकारी सहभागी असल्याचा संशय आहे. शनिशिंगणापूर येथे पोट भरणारे काही पुजारीही यात सहभागी आहेत. या पुजाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पुजाऱ्यांची चौकशी व्हावी
या गंभीर प्रकरणात शनिशिंगणापूर येथे पोट भरणारे काही पुजारीही सहभागी आहेत. या पुजाऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत शनिशिंगणापूर येथून कोट्यवधींची माया जमविली आहे. महागड्या गाड्या, कोटींचे बंगले, जमीन व स्थावर मालमत्ताही जमवली आहे. शनिशिंगणापूरातील सर्व पुजाऱ्यांची सीबीआय चौकशी व्हावी व त्यांच्या संपत्तीची मोजदाद व्हावी, अशी मागणीही आता होत आहे. काही पुजाऱ्यांचे नातेवाईकही या घोटाळ्यात सहभागी आहेत. या पुजाऱ्यांची करोडोंची संपत्ती, व राजा- महाराजांसारखी लाईफस्टाईल सध्या सोनईत चांगलीच चर्चेत आली आहे.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३