
सोनई, ता. 5ः गेल्या आठवड्यात पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी (ता. 30 जुलै) पत्रकार परिषद घेत, देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा असलेल्या कोट्यवधी रुपयांबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे ही रक्कम परवानगी दिलेल्या व न दिलेल्या अशा दोन्ही अॅपच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे तपासात समोर आले. आता या दोन कर्मचाऱ्यांना मिळालेल्या रकमेत वाटेकरी किती? ती रक्कम कुणाकुणाला गेली? याचा तपास सुरु आहे.
शनिशिंगणापूर येथील काही महाठगांनी 10 ते 15 बनावट अॅप तयार करुन देवस्थान व शनिभक्तांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विधानसभेत तारांकीत प्रश्नांच्या चर्चेदरम्यान आ. विठ्ठल लंघे यांनी हा मुद्दा चर्चेत आणला. भाजपचे आ. सुरेश धस यांनीही हे प्रकरण उचलून धरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवस्थान व विश्वस्त मंडळाने कशी फसवणूक केली, हे विधानसभेत पुराव्यासह सांगितले. त्यानंतर हा घोटाळा किती भयंकर आहे, हे समोर आले.
या प्रकरणाचा तपास चार पद्धतीने सुरु असल्याचे सांगितले जाते. धर्मदाय आयुक्तांसमोर मुंबईत विश्वस्तांची सुनावणी सुरु आहे. तर नगरचे सायबर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अॅप घोटाळ्याचा तपास करत आहे. आत्तापर्यंतच्या तपासात दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर एक कोटींहून अधिक रक्कम सापडली. या दोन कर्मचाऱ्यात एखादा पुजारी किंवा पुजाऱ्याचा नातेवाईक आहे का? हा प्रश्न चर्चेत आला आहे. दरम्यान मुंबई येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या 700 पानांच्या प्रमाणित नक्कलीवर सोमवारी (ता. 11) म्हणणे मांडले जाणार आहे. या नक्कलीत धर्मादाय आयुक्तांनी नेमके काय प्रश्न विचारले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
700 पानांच्या नक्कलीत काय?
पुढच्या सोमवारी म्हणजेच 11 ऑगस्टला देवस्थानच्या विश्वस्तांना 700 पानांच्या प्रमाणित नक्कलीवर आपेल म्हणणे मांडायचे आहे. या नक्कलीत काय आहे, हे विश्वस्त किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माहित नसल्याचे सांगितले जाते. या नक्कलीबाबत देवस्थानच्या वकीलांनाच माहिती आहे. परंतु 700 पानांच्या नक्कलीत धर्मादाय आयुक्तांना काहीतरी गंभीर प्रश्नांची उत्तरे हवी असावीत, अशा चर्चा आहेत.
अॅप घोटाळ्याचा तपास कुठपर्यंत?
पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अँप घोटाळ्याच तपास सुरु आहे. आत्तापर्यंत सुमारे 15 ते 20 संशयितांची चौकशी केल्याचे समजते. गेल्या आठवड्यात दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यात एक कोटींहून अधिक रक्कम सापडल्याचे तपासात समोर आले. आता हे पैसे कुणाच्या वाट्याला किती आले, याचा तपास सुरु आहे. शिवाय, शनैश्वर देवस्थानचा पुजारी असल्याचे खोटे सांगणारा पुजाऱ्यांचा एक पाहुणाही तपासात रडावर असून, त्याचीही चौकशी सुरु असल्याचे समजते.
तक्रारदार पोहोचले दिल्लीपर्यंत?
अँप घोटाळा गंभीर आहे. कधी 50 कोटी, कधी 100 कोटी तर कधी थेट 1000 कोटींचा हा घोटाळा असल्याच्या चर्चा होतात. त्यामुळे हा तपास सीबीआय किंवा थेट ईडीकडे द्यावा, अशी मागणी काही तक्रारदार करत असल्याचे समजते. नगर पोलिस, सायबर पोलिस व धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून तपास सुरु असतानाच, काही तक्रारदार थेट दिल्ली गाठणार असल्याची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत हे प्रकरण दाबले जाता कामा नये, म्हणून न्यायालय किंवा केंद्र सरकार, अशा दोन्ही पर्यायांचा शोध सुरु असल्याच्याही चर्चा आहेत.
इन्फॉर्मर मराठी :-
संपादक : किशोर दरदंले :-
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अश्याच नव नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.