
सोनई, ता. 17 ः शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील कथित 500 कोटींचा घोटाळा उघड झाल्यावर चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणात विश्वस्तांना नोटीसा बजावल्या. आता उद्या म्हणजेच शुक्रवारी (ता. 18) रोजी देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विश्वस्तांना मुंबईत स्वतः हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे हे सर्व विश्वस्त उद्या मुंबईला चौकशीसाठी जाणार असल्याचे समजते.
सायबर शाखेच्या पोलिसांनी देवस्थाने सुरक्षाअधिकारी व कार्यकारी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत, स्वतः घोटाळ्याची फिर्याद दिली. त्यानंतर मंगळवारी संपूर्ण देवस्थान परिसराचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर देवस्थानच्या 11 विश्वस्तांना जबाबदार धरुन त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या. शुक्रवारी (ता. 18) रोजी मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयात स्वतः किंवा वकिलामार्फत हजर राहण्याचे आदेश या नोटीशीद्वारे देण्यात आले. विश्वस्त मंडळ तातडीने बरखास्त करुन आता प्रशासक म्हणून स्वतः जिल्हाधिकाऱ्यांकडे या देवस्थानचा कारभार देण्यात येणार असल्याचे समजते.
याच चौकशीसाठी विश्वस्त उद्या मुंबईवारी करणार असल्याचे समजते. दरम्यान, सायबर पोलिस, अहिल्यानगर पोलिस, धर्मादाय आयुक्त व विधी व न्याय विभाग अशा चारही बाजूने या गंभीर फसवणुकीचा तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे. अॅपचा कर्ताधर्ता, कामगार, अॅप चालविणाऱ्यांची साखळी, संशयीतांचे व त्यांच्या नातेवाईकांचे बँकेतील ट्रान्झेक्शन, संशयीतांच्या आधार-पॅनवर झालेले व्यवहार, तसेच फोन काँल्स, फोनचा सीडीआर आदी सर्व तांत्रिक बाबी तपासल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय मुंबईची एक स्वतंत्र टीमही या प्रकरणाची समांतर चौकशी करत असल्याची माहितीही मिळत आहे.
कुणालाच सुट्टी नाही
हे प्रकरणा गाजल्यानंतर स्थानिक नेत्यांवरही आरोप करण्यात आले. या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला. भाजपची दबावाची स्टॅटर्जी पाहता, काही नेत्यांनी सत्तेत प्रवेश केला तर, हे प्रकरण दाबले जाईल का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली. परंतु सध्याची तपासाची दिशा व वेग पाहता हे प्रकरण, लवकरच उजेडात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विश्वस्त, कर्मचारी, पुजारी किंवा अन्य कुणीही या प्रकरणात अडकलेले असले तरी, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी काही स्थानिक कार्यकर्ते थेट दिल्लीला गेल्याचेही समजते.
केंद्रात व न्यायालयात जाणार?
हे प्रकरण गंभीर आहे. अनेकांनी या गैरव्यवहारात करोडोंची माया जमविली आहे. या साखळीतील मोठ्या माशांनी करोडोंत, तर लहान माशांनी लाखोंत कमावल्याच्या चर्चा आहेत. तपासातील तत्परता पाहता या प्रकरणाचा तपास लवकरच पूर्ण होईल, असे दिसते. परंतु तरीही, यापूर्वी शनैश्वर देवस्थानवर झालेले काही आरोप दाबले गेल्याचा इतिहास पाहता, यावेळी आरोप करणारे सजग झाले आहेत. उच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्याची प्रक्रिया काहींनी सुरु केल्याचे समजते. शिवाय काहींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याचा प्लॅनही आखल्याचे समजते. हे प्रकरण दाबले जाऊ नये म्हणून, काही स्थानिक कार्यकर्ते या तिन्ही नेत्यांसमोर आपली कैफियत मांडणार असल्याची माहिती मिळत आहे.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अश्याच नव-नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
jbvuyq