शनिशिंगणापूर लूट पॅटर्न : फडणवीससाहेब, भाजपवरचा विश्वास वाढविण्याची संधी सोडू नका.

सोनई, ता. 13 ः शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये कर्मचारी, पुजारी व विश्वस्तांनी बनावट अॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने ५०० कोटींहून अधिक पैसे लुटल्याचा आरोप होत आहे. हा मुद्दा आ. विठ्ठल लंघे, आ. सुरेश धस यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत उपस्थित केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सभागृहात सांगितले. आता सायबर पोलिसांनी शनिवारी पहिला गुन्हाही दाखल केला. आता फक्त यातील सगळीच साखळी शोधून काढण्याची परीक्षा पोलिसांना द्वावी लागणार आहे. ही कारवाई योग्य प्रकारे झाली तरच भाजपवरचा सामान्यांचा विश्वास कायम राहणार आहे.

देवस्थानमध्ये बनावट ॲप आणि पावत्यांद्वारे देणगी वसुल करून तसेच हजारो बनावट कर्मचाऱ्यांची नोंद करून गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार, संस्थानच्या विविध विभागांत २,४४७ बनावट कर्मचारी दाखवण्यात आले. त्यांच्या नावाने पगाराचे पैसे काही अन्य व्यक्तींच्या खात्यांत पाठविण्यात आले. रुग्णालय विभागात ३२७ कर्मचारी दाखवले गेले, प्रत्यक्षात केवळ १३ कर्मचारी उपस्थित होते. अस्तित्वात नसलेल्या बागेच्या देखभालीसाठी ८० कर्मचारी, १०९ खोल्यांच्या भक्तनिवासासाठी २०० कर्मचारी, १३ वाहनांसाठी १७६ कर्मचारी, प्रसादालयात ९७ कर्मचारी दाखवण्यात आले होते. इतर विभागांमध्येही असेच बनावट कर्मचारी दाखवण्यात आले आहेत. बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असून सायबर पोलिसांकडून याचा स्वतंत्र तपास सुरू आहे. जे ट्रस्टी लोकसेवकांच्या व्याख्येत येतात, त्यांच्या संपत्तीची चौकशी केली जाईल असेही फडणवीस म्हणाले.

आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पैशावर झोपणारे दोन-तीन विश्वस्त, काही पुजाऱ्यांचे मास्टरमाईंड पाहुणे-रावळे, काही पुजाऱ्यांचे ‘शायनर’ पोरं आणि बोगस भरती केलेले काही अतिउत्साही कार्यकर्ते या सर्वांची संपत्ती जप्त करुन त्यांना तुरुंगात टाकण्याची जबाबदारी फडणवीस सरकारवर आहे. नाहीतर, यापूर्वीच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांप्रमाणे, यात सहभागी असलेल्या काही नेते-कार्यकर्त्यांना महायुतीत प्रवेश देऊन त्यांना ‘शुद्ध’ करुन घेतले, तर हा तपासही थंड बस्त्यात जाईल. यातील आरोपींना गजाआड करण्याची नामी संधी भाजपला आली आहे. या प्रकरणाचा योग्य तपास करुन, भाजपवरचा विश्वास फडणवीसांनी कायम ठेवावा, अशी आमची इच्छा असल्याचे काही शनिभक्तांनी ‘इन्फाँर्मर मराठी’शी बोलताना सांगितले.

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३ अश्याच नव -नवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला subscribe करा.

One thought on “शनिशिंगणापूर लूट पॅटर्न : फडणवीससाहेब, भाजपवरचा विश्वास वाढविण्याची संधी सोडू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *