
सोनई, ता. 13 ः कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थान लूटीबाबत शनिवारी पहिला गुन्हा दाखल झाला. सायबर शाखेचे पोलिस उपनिरिक्षक सुदाम काकडे यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झाला. या तक्रारीत पाच अनधिकृत अॅप, त्यांचे मालक व त्यासंबंधीचे कर्मचारी अशा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिशिंगणापूर घोटाळा थेट विधानसभेत गाजल्यानंतर तातडीने पावले उचलली गेली. आता एवढीच तत्परता आरोपींना अटक करण्यासाठी व त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी दाखविली जाईल का, हा खरा प्रश्न आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात शनिची साडेसाती लागतेच. आपण केलेल्या पाप-पुण्याच्या हिशोबानुसार शनिदेव ज्याला-त्याला न्याय देतात. त्यामुळे नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर हे जगभर चर्चेत असते. येथील घरांना दार नाही. कडीकोंडा नाही. येथे चोरी होत नाही. चोरांना शनिमहाराज शिक्षा करतात, अशी श्रद्धा आहे. मात्र याच शनिदरबारात काही विश्वस्त, कर्मचारी व काही पुजाऱ्यांनी शेकडो कोटींचा अफलातून घोटाळा केला. हा विषय चर्चेत आल्यानंतर पहिल्यांदा तो दाबला जाईल, अशी नेहमीप्रमाणे शंका आली. मात्र काही सजग भक्तांनी हा विषय लावून धरल्यानंतर तो विधानसभेच्या लक्षवेधी प्रश्नांपर्यंत गाजला. काही महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी दोषींची बाजू लावून धरणाऱ्या बातम्याही लावल्या. परंतु शनिच्या दरबारात न्याय होईल, ही आशा शनिभक्तांना होती. झालेही तसेच… हा विषय विधानसभेत आ. विठ्ठल लंघे व आ. सुरेश धस यांनी लावून धरला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
ऑनलाईन बोगस अॅप, क्यूआर कोड व ऑनलाईन पुजेच्या नावाने फसवणूक करणारांविरोधात सायबर पोलिसांनी स्वतः तक्रार दिली. त्यात घरमंदीर डाँट इन, हरीओम अँप, ऑनलाईन प्रसाद डाँट काँम, पुजापरिसेवा डाँट काँम आणि ई-पूजा डाँट काँम या 5 अॅपच्या अज्ञात मालक, पुजारी व कामगारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या अॅपच्य मालक, कामगारांनी मंदीराची किंवा धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता शनिशिळेचा फोटो, शनिमंदीराचा व महाद्वाराचा फोटो वापरुन अधिकृत पुजारी असल्याचे भासवून शनैश्वर देवस्थान येथे शनिदेवाची पुजा, अभिषेक व तेल चढविण्याचे उद्योग केले. स्वतःच्या फायद्यासाठी देवस्थानची व भाविकांच्या श्रद्धेची फसवणूक केली, असे या तक्रारीत म्हटले आहे.
तपासासाठी कायदेशीररित्या तक्रार दाखल होणे गरजेचे होते. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम 318 (4), 336 (3), 3 (5) अन्वये हा गुन्हा दाखल झाला. आता जसजसा तपास पुढे जाईल तसतशी याची व्याप्ती लक्षात घेऊन मालक, कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल होतील. परंतु हा तपास लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३ अशाच नव -नवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला subscribe करा.