
सोनई, ता. 5 : शनिदेवाचे जागृत देवस्थान म्हणून शनिशिंगणापूर ओळखले जाते. चोरी होत नाही या भावनेतून या गावांतील घरांना व तिजोरींना दरवाजेही नाहीत. परंतु याच शनिशिंगणापूरातील देवस्थान अँपचा घोटाळा सध्या राज्यभर चर्चेत आला आहे. शनैश्वर देवस्थानने भक्तांच्या सोयीसाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन शनीपूजा आणि शनीदर्शनाची सशुल्क सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा गैरफायदा उठवत, काही कर्मचाऱ्यांनीच बनावट अॅप तयार करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. याप्रकरणी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा घोटाळा सर्वदूर पसरला. आता या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
कसा झाला घोटाळा?
भक्तांना ऑनलाइन शनिदर्शन घेता यावे, यासाठी देवस्थानने अधिकृतपणे अॅप सेवा सुरू केली. ती सेवा गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले जाते. परंतु याच बंद सेवेचा गैरफायदा देवस्थानच्या काही कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी उठवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. देवस्थानच्या अँपसारखेच दुसरे बनावट मोबाईल ॲप तयार करून काहींनी देशातील व परदेशातील शनिभक्तांना गंडवले. शनिदेवाचा अभिषेक, पूजा, काळे वस्त्र, नाळ किंवा अन्य विविध पूजेचे लालच दाखवत या बनावट अॅपद्वारे एकेका व्यक्तीकडून हजारो रुपये घेण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.
कशी झाली फसवणूक?
विशेष म्हणजे शनिदेवस्थानच्या नावासारखेच बनावट चार ते पाच अॅप असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. एकेका अॅपचे सुमारे दोन ते तीन लाख सबस्क्रायबर आहेत. सबस्क्रायबर म्हणजेच शनिभक्त असल्याने, त्यांनी या बनावट अॅपद्वारे कोणती ना कोणती पूजा केली असेल, अशी शंका आहे. प्रत्येक सदस्याकडून 1800 रुपये घेतले जात असल्याचा, आरोप आहे. हे शुल्क देवस्थानच्या तिजोरीत जमा न होता परस्पर कामगारांच्या खासगी खात्यात जमा होत असल्याचेही तक्रारी म्हटले आहे.
किती कोटींचा घोटाळा?
एका व्यक्तीकडून कमीत कमी 1800 रुपये शुल्क आकारण्यात आले असल्याचा संशय आहे. याच आकड्याची व सबस्क्रायबर्सची बेरीज केल्यास हा आकडा 300 ते 400 कोटी रुपये होतो. म्हणजेच एका अॅपद्वारे अंदाचे 300 कोटींचा गंडा पाहिल्यास चार-पाच अॅपद्वारे किती कोटींची फसवणूक या भामट्यांनी केली असेल, याचा अंदाज बांधता येतो.
कुणी घेतला पुढाकार?
काँग्रेसचे कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी माळवदे, भाजपचे कार्यकर्ते विशाल सुरपुरिया, माजी विश्वस्त डाँ. वैभव शेटे यांनी याबाबत तक्रार केली आहे. पोलिस अधिक्षक ते थेट मंत्रालय व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत या गंभीर प्रकाराच्या तक्रारी करण्यात आल्याची माहिती, भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी दिली. तक्रारी वाढल्यानंतर देवस्थानने त्यांचे अधिकृत अॅप बंद केल्याचे स्पष्ट केले. परंतु जर एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय, तर देवस्थानला याची माहिती कशी मिळाली नाही, हाही एक प्रश्न समोर आला आहे.
देवस्थानात लुटारुंची साखळी
शनैश्वर देवस्थानच्या नावाने खोटे व बोगस ॲपची निर्मिती करुन आर्थिक लूट व अपहार झाल्याबाबत देवस्थानची, देवस्थानामधील सर्व कर्मचारी व सर्व वरिष्ठ अधिका-यांची सखोल चैाकशी करावी. तसेच सर्वांच्या संपत्तीची व मालमत्तेचीही चैाकशी करुन संबंधित ॲप निर्मितीमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करुन संबंधितांना कठोर शासन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. हा घोटाळा दिसतो तेवढा सोप्पा नक्कीच नाही. अनेक मोठे मासे यात अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३