हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यात गेली तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागासह पश्चिम भागात अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर पठारा मधील हिवरगाव पठार, निमज ,नांदुरी दुमाला, सावरगाव तळ, चंदनापुरी मिर्झापूर ,धांदरफळ खुर्द या गावांना गारपिटीने झोडपले. अवकाळी पावसाचा जोर इतका होता कि काही काळ डोंगरकडेही जोरात वाहू लागले होते.
पिकांचे मोठे नुकसान
अवकाळी आलेल्या पावसाने व गारपिटीने शेतीतील कांदा ,उन्हाळी बाजरी, गहू, डाळिंब आदी पिकांची नासाडी झाली. शेतातील उभे पीक कोलमडल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
पंचनामे करण्याची मागणी
उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी कोलमडला आहे. या नुकसानीची त्वरीत पंचनामे करण्याची मागणी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून उत्पन्न घेतले आहे. हे करताना त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. ऐकिले बाजार भाव नाही, दुसरीकडे कर्जाचा डोंगर, आणि यात आता गारपिटीने झालेले नुकसान, यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी माजीमंत्री थोरात यांनी केली आहे. दरम्यान जिल्ह्यातही अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.