नगरकरांसाठी आनंदाची बातमी! जिल्ह्यात आल्या नव्या ४५ एसटी गाड्या, कोणत्या आगाराला किती? वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन ४५ एसटी बसेस गाड्यांचे लोकार्पण व अहिल्यानगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तारकपूर बस स्थानक येथे करण्यात आला. नगर जिल्ह्यातील सर्व आगाराला या बसगाड्या देण्यात आल्या आहेत.

कुठे झाले लोकार्पण?


नगर शहरातील तारकपूर आगारात या सर्व गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह आमदार शिवाजी कर्डीले, आमदार संग्राम जगताप, अभय आगरकर, बाबू टायरवाले, विनायकराव देशमुख, श्रीमती दानवे, आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी आदी उपस्थित होते. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस. टी. महामंडळाने प्रवाशांना खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्यक्रमात केले.

काय म्हणाले विखे?


पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, एसटी बस ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. पूर्वीच्या काळात गावात एसटी बस येणे मोठी मानाची गोष्ट समजली जात होती. आज आधुनिकीकरणामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल झाले आहेत. खासगी वाहतुकीच्या बरोबरीने सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात अनेक आधुनिक बस दाखल झाल्या असून याद्वारे महामंडळाने प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देत प्रवाश्यांना एसटीकडे आकर्षित करून घेतले पाहिजे.

नेत्यांनी केला बसमध्ये प्रवास?


एसटी बसच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एसटी बसमधून प्रवास करत प्रवाश्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती घेतली. त्यांच्यासोबत आ. शिवाजी कर्डिलेही होती. जिल्ह्यातील एसटी बस स्थानकांचे सुशोभीकरण, बस स्थानकांची व बसेसच्या नियमित स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. एसटी स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमास सहायक यंत्र अभियंता महेश कासार, शेवंगावचे आगार व्यवस्थापक अमोल कोतकर, भांडार अधिकारी संकेत राजहंस, स्थानक प्रमुख अविनाश कलापुरे यांच्यासह नागरिक उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *