सध्या नगर जिल्ह्यात शेतीची कामे जोरात सुरु आहेत. अनेक ठिकाणी तर अजून शेतात गहू सोंगणीला सुरुवातही झालेली नाही. गव्हाचे पीक जास्त प्रमाणात असल्याने गहू काढणीला मजूर किंवा यंत्रणा मिळत नाही. त्यातच आता शेतकऱ्यांना धक्का बसेल अशी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिल या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
यलो अलर्ट जाहीर
१ एप्रिलला वादळी वाऱ्यासोबत गारपीटही होण्याची शक्यता, हवामन विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला असून, लोकांनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. यंदा पाऊस चांगलाच झाला. मार्चपर्यंत भूजलपातळीही बऱ्यापैकी वाढली, त्यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमात आली. बहुतांश ठिकाणी रब्बी पिकांची काढणी झाली असली, तरी काही भागात गहू आणि इतर पिके अजून शेतात उभी आहेत.
सोमवार ते बुधवार वादळी पाऊस
हवामान खात्याने सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवल्याने ही उभी पिके धोक्यात येण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे शेतकरी आपली पिके लवकरात लवकर काढण्याच्या तयारीला लागले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या सूचनांनुसार, विजांचा कडकडाट होत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांच्या जवळ थांबू नये. खांब, विद्युत खांब, विद्युतवाहिन्या यांच्यापासूनही लांब राहावे.
काय दिल्या आहेत सुचना
विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात, टॉवर्सजवळ, ध्वजस्तंभाजवळ किंवा रोहित्रांजवळ उभे राहणे टाळावे. गारपिटीच्या वेळी मोकळ्या जागेत असाल, तर ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जा. विजा चमकत असताना मोकळ्या जागेत असाल, तर गुडघ्यावर बसून हाताने कान झाकावेत आणि डोके गुडघ्यांमध्ये घ्यावे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणला असेल, तर त्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. काहीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जवळचे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.