
सोनई, ता. 14ः सोनई येथील दरंदले गल्लीत सुमारे एक कोटींच्या लोकवर्गणीतून तुळजाभवानी मंदीराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या मंदीराचा सुमारे पाच दिवसांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोनई पंचक्रोशीतील दरंदले पाटील परिवाराच्या पुढाकारातून हे मंदीर साकारण्यात आले आहे. सोमवार दि. 18 ऑगस्टपासून हा सोहळा सुरु होणार आहे.
सोनई हे ऐतिहासीक गाव आहे. कौतुकी नदीमुळे गावाचे दोन भाग पडले आहेत. नदीच्या पूर्वीकडील भागात जसा शेटे पाटलांचा वाडा आहे, तसाच दक्षिणेत दरंदले पाटलांचा वाडा आहे. दगडी बांधकामातील हे चिरेबंदी वाडे गावाची शोभा वाढवतात. गावात दरंदले आडनावाचे सुमारे 50 टक्के लोक वास्तव्य करतात. दरंदले पाटलांच्या वाड्याशेजारी असलेल्या दरंदले गल्लीत दरंदले यांची पूर्वापार जागा होती. या जागेत काळानुरुप जास्त वारस तयार झाल्यानंतर ही जागा दरंदले पाटील परिवाराची कुलदेवी आई तुळजाभवानी माता मंदीरासाठी देण्याचा प्रस्ताव पुढे आला. सुमारे वीसहून अधिक दरंदले पाटलांनी या प्रस्तावावर होकार दिल्यानंतर जागा मंदीर ट्रस्टला देणगी स्वरुपात देण्यात आली. त्यानंतर गावातील सर्व दरंदले पाटील आडनावाच्या लोकांनी या मंदीरासाठी देणगी दिली. शिवाय तुळजाभवानी मातेच्या इतर भक्तांनीही या मंदीराच्या बांधकामासाठी सढळ हाताने मदत केली. काही दिवसांतच मंदीराचे सुमारे एक कोटींचे बांधकाम पूर्ण झाले.

या मंदीराच्या पहिल्या टप्प्यात संरक्षक भिंत, दुसऱ्या टप्प्यात वृक्षारोपण करुन बांधकाम, त्यानंतर गाभारा, सभामंडप तयार करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात नांदेड येथील कारागिरांमार्फत सुमारे 41 फुटांचे शिखर बांधण्यात आले. माजी आ. शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या 10 लाख रुपये निधीतून देवस्थानचे कार्यालय बांधण्यात आले. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात सुमारे 10 लाख रुपये खर्चाची दगडी दीपमाळही तयार बांधण्यात आली. तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदीराची हुबेहुब प्रतिकृती यामुळे तयार झाली.
या मंदीराच्या लोकार्पण सोहळा पाच दिवसांचा होणार आहे. त्यानिमित्ताने सोमवारी दि. 18 रोजी तुळजाभवानी मातेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवारी दि. 19 रोजी देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते देवीच्या सिंहासनाचे पूजन करण्यात येणार आहे. बुधवारी दि. 20 रोजी तुळजापुरचे महंत तुकडोजी महाराज व महंत जंगले महाराज यांच्या हस्ते मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गुरुवारी दि. 21 रोजी संत एकनाथ महाराजांचे वंशज योगिराज महाराज यांचे कीर्तन होणार आहे. गावातील पुरातन बालाजी मंदीराच्या समोरच हे मंदीर बांधण्यात आले असून, सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या या मंदीरामुळे सोनईच्या शोभेत नक्कीच भर पडणार आहे.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अश्याच नव नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा…