
किशोर दरंदलेः इन्फाँर्मर मराठी.
सोनई, दि. 10 ः शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये शेकडो कोटींच्या अॅप घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. अहिल्यानगर पोलिस व धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. तक्रारदारांनी या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता व तपासातील दबाव लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेण्याची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे या गंभीर गुन्ह्याबाबत भक्तांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे का? हा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे.
शनिशिंगणापूर देवस्थान हे वारंवार वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे चर्चेत येते. 20 जून 2018 साली शनिशिंगणापूर देवस्थान राज्य सरकारने ताब्यात घेतले. त्यावेळी कॅबिनेटच्या बैठकीत यावर निर्णय झाला होता. परंतु गेल्या सात वर्षांत यावर पुढचे पाऊल उचलले गेले नाही. या देवस्थानवर राजकीय हस्तक्षेप होतोय, हा आरोप आजही कायम आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला तर, करोना काळानंतर या देवस्थानमध्ये भ्रष्ट्राचाराचे अनेक आरोप झाले. परंतु त्यावर जास्त काही चर्चा केली गेली नाही. वारंवार या प्रकारांवर पांघरुन घातले गेले, अशी चर्चा सुरु झाली. आता शनिशिंगणापूरातील एक नवीन घोटाळ्याच्या चर्चा सुरु आहेत.
‘त्या’ 9 अॅपचे काय?
सध्या सोशल मीडियावर एक तक्रार अर्ज व्हायरल होत आहे. या अर्जात काही संशयीत आरोपी व बनावट अॅपच्या नावाची माहिती देण्यात आली आहे. या तक्रार अर्जाच्या प्रती महसूलमंत्री, मुख्यमंत्री, पोलिस अधिक्षक, पालकमंत्री व धर्मादाय आयुक्तांना दिल्याचे या अर्जावरुन दिसत आहे. या अर्जात
- App,
- Shemaro.com,
- Ghar Mandir.com,
- Hari Om.com,
- Puja.com,
- Online Prasad.com,
- Utsav.com,
- Puja Pariseva.com,
- Hari Om App
या नऊ अॅपचा संशयीत म्हणून उल्लेख केला आहे. परंतु या अर्जावर कुणाचीही सही नाही. त्यामुळे हा अर्ज खरा की खोटा हे समजू शकले नाही. परंतु या अॅपची चौकशी सुरु आहे का? हा खरा प्रश्न आहे. हे अॅप खरंच कायदेशीर आहेत का, ही चौकशी करण्यास काय हरकत आहे, असा सूर शनिभक्तांमधून निघत आहे.
‘त्यांच्या’ नजरेत फक्त तीघे दोषी
शनिशिंगणापूर मधील अॅप घोटाळ्याबाबत काँग्रेस, भाजप व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्या तक्रारीत आठ ते नऊ बनावट अॅपचा उल्लेख केला आहे. परंतु देवस्थानने फक्त तीन अॅपचीच तक्रार दिली. मग तक्रारदारांनी सांगितलेले आठ ते नऊ अॅप कोणते? पोलिस नेमका कोणत्या अॅपचा तपास करत आहेत? तक्रारदारांच्या अर्जांचा की देवस्थानच्या तक्रारीचा? नेमका तपास कशाचा सुरु आहे? हा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
इतर गोष्टींचीच होतेय चर्चा
बनावट अॅप, क्यूआर कोड व बनावट पावती पुस्तके अशा तीन आघाड्यांवरील तक्रारी पोलिसांना दिल्याच्या चर्चा सध्या सोनई व परिसरात सुरु आहेत. परंतु आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून वेगळ्याच प्रकरणाच्या चर्चा होताना दिसत आहेत. कधी सुरक्षेच्या कारणास्तव देवस्थानने रात्रीचे दर्शन बंद केल्याच्या निर्णयाची चर्चा होते. तर कधी देवस्थानमध्ये कामाला असलेल्या 111 गैर हिंदू कामगारांची चर्चा होते. या चर्चांमध्ये बनावट अॅप प्रकरण किंवा बनावट क्यूआर कोड प्रकरण या गंभीर मुद्यांवरुन लक्ष विचलीत केले जातेय का? ही शंका आहे.
खरंच तपास होईल का?
शनैश्वर देवस्थानमध्ये यापूर्वी अनेक प्रकरणांचे आरोप झाले. परंतु यापैकी बरीच प्रकरणे काही दिवसानंतर ‘थंड बस्त्यात’ बांधली गेली. आता बनावट अॅपच्या शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरणही असेच शांत होईल का? हा खरा प्रश्न आहे. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ हे प्रकार नेमके का घडतात? गृहमंत्री, मुख्यमंत्री व सरकार हिंदूत्ववादी असतानाही शनैश्वर भगवानांना न्याय का मिळत नाही? हेच खरे तर कोडे आहे. किमान या बनावट अॅप प्रकरणाची व त्यात सहभागी असलेल्या ‘धनदांडग्यां’ची चौकशी व्हावी, हीच माफक अपेक्षा शनिभक्तांकडून व्यक्त केली जात आहे.
शनिभक्तच मुख्यमंत्र्यांना भेटणार?
बनावट अॅप प्रकरणात काही स्थानिक लोक सहभागी आहेत, अशी चर्चा आहे. बनावट पूजेच्या नावाखाली लुटलेल्या कोट्यवधी रुपयांमुळे परिसरातील अनेकांची ‘लाईफस्टाईल’ बदलली आहे, असेही सांगितले जात आहे. आता स्थानिक पुढारी, पोलिस किंवा नेत्यांनी या प्रकरणात लक्ष दिले नाही तर, थेट संभाजीनगर खंडपीठ व त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे या सगळ्या ‘साखळी’ची पोलखोल करण्याचा निर्धार काही शनिभक्तांनी केला आहे, असेही सांगितले जात आहे.
इन्फॉर्मर मराठी :
मुख्य संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३
subscribe करा नव- नवीन बातम्या बघण्यासाठी .