राहुरी बंदचा निर्णय मागे; महापुरुषांच्या बदनामी प्रकरणात राहुरीकरांची संयमाची भूमिका

राहुरी शहरातील बुवासिंदबाबा तालमीत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकाराचा समाजाच्या सर्व स्थरातून निषेध करण्यात आला. पोलिसांचा तपास सुरु असला तरी, घटनेला तीन-चार दिवस उलटूनही या प्रकरणात अद्याप कुणालाच अटक करण्यात आली नव्हती. त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी १ एप्रिलपासून राहुरी बंदची हाक दिली होती. परंतु ३१ मार्चला ग्रामस्थ, व्यापारी व प्रशानसाने बैठक घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला.

राहुरीत ग्रामस्थांची बैठक

राहुरीतील पुतळा विटंबन प्रकरणात आरोपींना अटक होत नसल्याने, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी १ एप्रिलपासून राहुरी शहर बेमुदत बंदची हाक दिली होती. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी राहुरीत पोलिस प्रशासन आणि सर्वपक्षीय नेत्यांनी शांतता समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर अरुण तनपुरे यांनी बंदबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “प्राजक्त तनपुरे, व्यापारी आणि शिवप्रेमी यांच्याशी बोलल्यानंतर हा बंद मागे घ्यायचं ठरलं आहे. राहुरीत उद्योग-व्यवसाय सुरळीत चालतील. सगळ्यांनी शांतता राखून सहकार्य करावं.”

व्यापाऱ्यांनीही मांडल्या समस्या

व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख यांनीही आपलं मत मांडलं. ते म्हणाले, “राहुरी बंदला व्यापाऱ्यांनी मनापासून पाठिंबा दिला होता. या घटनेतले आरोपी पकडले जावेत, ही सगळ्यांचीच इच्छा आहे.पण व्यापाऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी सर्वांच्या संमतीने हा निर्णय मागे घेतला.” या चर्चेत विलास साळवे, बाळासाहेब उंडे, निलेश जगधने, सुरज शिंदे यांनीही भाग घेतला. बैठकीत एक गोष्ट स्पष्ट झाली की, आरोपी हिंदू असो वा मुस्लिम, त्याला कठोर शासन व्हायला हवं. घटना घडून पाच दिवस झाले तरी आरोपी सापडले नाहीत, हे लाजिरवाणं आहे. बाहेरून येणाऱ्यांनी राहुरीत वाद घालू नये, असंही सांगण्यात आलं.

प्रशासनाचं म्हणणं काय

राहुरीकर आपल्या समस्या सोडवण्यात सक्षम आहेत आणि पोलिसांनी आपली जबाबदारी चोख बजवावी, असा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत ठरला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यावेळी सर्वांच्या भावना समजून घेतल्या.मराठा एकीकरण समितीचे समन्वयक देवेंद्र लांबे यांनी सांगितलं, “एकीकरण समिती आणि क्रांती मोर्चाच्या वतीने पोलिस ठाण्यासमोर आंदोलनाचा निर्णय होता, तोही मागे घेतला आहे. पण पोलिसांनी तातडीने आरोपी पकडावेत, ही मागणी कायम आहे.” या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की, राहुरीत शांतता राखली जाईल, पण आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला आहे. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडावं, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *