महायुती सरकारच्या सर्व योजना सुरुच राहतील. विरोधक टिका करतात तशाच कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. शेतकऱ्यांच्या योजनाही सुरुच राहतील, उलट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारचा विचार सुरु असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शेतकरी कर्जमाफीचा विषय हा महायुतीच्या जाहीरनाम्यात असल्याने त्याची अंमलबजावणी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोणी बुद्रुक येथील मारुती मंदीरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पारंपारिक ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेला मंत्री विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या ग्रामसभेत विखे यांनी महायुती सरकारच्या योजनांचा पाढा वाचला. या वेळी गावाच्या विकासासाठी नव्या संकल्पांचा निर्धार करण्यात आला. बैठकीत मंत्री विखे यांनी आगामी काळातील विकासकामांची माहिती दिली. जिल्ह्यातील पाटपाण्याच्या प्रश्नांवरही जलसंपदा विभागाच्या धोरणांचा आढावा घेतला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनीही मार्गदर्शन करत विकासाचा रोडमॅप स्पष्ट केला. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले असल्याचे सांगितले.
विखे पाटील यांनी, योजनांची यशस्वी अंमलबजावणी महायुतीचे प्रमुख धोरण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुती सरकारने यापूर्वी एक रुपयात पीक विमा योजना, कापूस व सोयाबीन अनुदान योजना, तसेच ‘लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत, याबाबत त्यांनी माहिती दिली. या योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात आले आहे. विखे यांनी राज्यातील महायुती सरकारच्या विविध योजनांचीही माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेचे सर्व हप्ते वेळेवर मिळत आहेत. कुठलीही योजना बंद पडलेली नाही. लाडकी बहिण योजना सुरुच राहील.
महायुती सरकारच्या योजनांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर विखे पाटील यांनी कडाडून हल्लाबोल केला. काही ठरावीक लोकांना पोटशूळ उठला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विखे पाटील यांनी यावेळी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांनाही टोला लगावला. त्यांनी आपले घर सांभाळावे, असा चिमटा विखे यांनी काढला.