रोहित पवारांनी करुन दाखवलं! कर्जतमध्ये रंगल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा; वेताळ शेळकेने जिंकली चांदीची गदा

अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या चांदीच्या गदेवर सोलापूरच्या वेताळ शेळकेने नाव कोरले. त्याने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला. अहिल्यानगरमधील कर्जत शहरात आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते. शरद पवारांच्या हस्ते वेताळ शेळके याला चांदीची गदा भेट देण्यात आली.

शरद पवारांची उपस्थिती


अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, आ. रोहित पवार, खा. निलेश लंके आदी उपस्थित होते. स्पर्धेत गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला. त्यामध्ये मोळी डाव वापरून पृथ्वीराज पाटीलने शिवराज राक्षेचा पराभव केला. तर सोलापूरच्या वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमिफायनरमध्ये अकोल्याच्या प्रशांत जगतापचा पराभव केला होता.

कोण आहे वेताळ शेळके?


वेताळ शेळके हा पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी ठरला असून त्याच्या विजयानंतर लोकांनी एकच जल्लोष केला. वेताळ शेळके सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभूर्णी येथील रहिवाशी आहे. त्याचे मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील बादलेवाडी आहे. तो माती विभागातून महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीसाठी पात्र ठरला होता. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पैलवान म्हणून त्याची ओळख आहे. मॅटवर सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने यापूर्वीही अनेक पदके जिंकली आहेत. त्याने यापूर्वी जागतिक आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. मातीवरच्या कुस्तीतही तो तरबेज म्हणून ओळखला जातो. सध्या तो पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे.

अहिल्यानगरमध्ये दुसरी स्पर्धा


महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील अंतिम लढतीच्या निकालावरून चांगलाच गोंधळ झाला होता. शिवराज राक्षेनं पंचांना मारलेल्या लाथेवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. ही स्पर्धा अहिल्यानगर शहरात झाली होती. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *