शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (30 मार्च) ‘हैद्राबाद शिर्डी हैद्राबाद नाईट लँडिंग’ विमानसेवेला अधिकृत सुरुवात झाली. हैद्राबादहून आलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या पहिल्या विमानाचे जलतुषार देऊन स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या विमानसेवेने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमानंतर माजी खा. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यात शिर्डीलाच नवीन विमातळ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
दक्षिणेतील साईभक्तांसाठी सुविधा
नवीन नाईट लँडिंग सुविधेमुळं दक्षिण भारतातील साईभक्तांना एका दिवसात शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन परत जाणं शक्य होणार आहे. रात्री 9:30 वाजता हैद्राबादहून निघालेले 60 प्रवाशांनी भरलेले एटीआर विमान शिर्डी विमानतळावर उतरलं आणि परत 10:30 वाजता दुसऱ्या भाविक प्रवाशांना घेऊन हैद्राबादकडं रवाना झालं. विमानतळ प्रशासन आणि भाविकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत जलतुषार अभिवादनाने विमानाचं स्वागत केलं. यावेळी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी प्रवाशांचे पुष्पगुच्छ, साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसेच केक कापून त्यांच स्वागत केलं.
भाविकांसाठी सुलभ प्रवास
गेल्या दोन वर्षांपासून शिर्डी विमानतळावर रात्रीच्या सेवांची प्रतिक्षा होती आणि अखेर ती प्रतिक्षा रविवारी संपली. या सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भाविक आता पहाटेच्या साईबाबांच्या काकड आरतीला उपस्थित राहण्यासाठी रात्रीच्या विमानसेवेचा लाभ घेऊ शकतील. नाईट लँडिंग सेवेमुळं शिर्डी आणि परिसराच्या विकासाला गती मिळेल. वाढत्या प्रवाशांमुळं स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच हॉटेल्स, वाहतूक आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना मोठा फायदा होणार असल्याचं माजी खासदार सुजय विखे यांनी सांगितलं.
काय म्हणाले सुजय विखे?
खासदार सुजय विखे म्हणाले की, शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधेच्या प्रारंभामुळं भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळं भाविकांना लवकर आणि सुलभ प्रवास शक्य होईल तसेच स्थानिक अर्थकारणाला मोठी चालना मिळेल. या नव्या सेवेच्या शुभारंभामुळं शिर्डी विमानतळाचा दर्जा आणखी उंचावला आहे”. भविष्यात शिर्डीतील हवाई वाहतूक आणखी वाढण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.
11 विमानांची वाहतूक सुरु
एअरलाइन्सने दोन अतिरिक्त विमानांचा समावेश केला आहे. ज्यात एक सकाळची आणि एक रात्रीची सेवा आहे. विशेष म्हणजे इंडिगोने हैदराबाद-शिर्डी-हैदराबाद मार्गावर आजपासून 78 प्रवाशांच्या क्षमतेची नियमित विमानसेवा सुरू केली. यामुळं शिर्डी विमानतळावर आता दररोज एकूण 11 विमानांची (22 हालचाली ) वाहतूक होईल. ज्यामुळं दररोज अंदाजे 3000 प्रवाशांची सोय होईल. जो विमान वाहतूक उद्योगातील वाढ आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा विकास आहे.
कुंभमेळ्याची तयारी सुरु
सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, शिर्डी विमानतळ ५०० कोटी रुपये खर्चून बांधले जाणार असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल. या विमानतळावर किमान चार ते पाच एरो ब्रिजची सुविधा असेल. आमचा प्रयत्न आहे की, हे नवीन विमानतळ २०२७ पूर्वी पूर्ण होईल. ज्यामुळे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल. या संदर्भात पुढील आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे विमानतळ दोन वर्षांत पूर्ण करू, असा विश्वासही विखे पाटील यांनी व्यक्त केला.