नदी प्रदुषणाला घातला हात
राज ठाकरे यांनी आज नदी प्रदुषणाच्या मुद्याला हात घातला. ते म्हणाले की, देशात नद्या स्वच्छ करण्याच्या घोषणा झाल्या. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे गंगेची अशी परिस्थिती आहे. गंगा स्वच्छ करण्याची घोषणा स्व. राजीव गांधी यांच्यापासून आपण ऐकतोय. पण ती स्वच्छ झाली नाही.आपण नद्यांना माता म्हणतो, देवी म्हणतो. पण नद्यांची अवस्था काय आहे? राजीव गांधी ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वच पंतप्रधान म्हणतात, गंगा स्वच्छ करायची आहे. परंतु त्यातील पाणी पिऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. प्रश्न हा कुंभमेळा किंवा गंगेच्या अपमानाचा नाही. त्या ठिकाणी असलेल्या पाण्याचा विषय आहे. आतापर्यंत ३३ हजार कोटी रुपये खर्च झाले आहे. पण नद्या स्वच्छ झाल्या नाहीत.
लाव रे तो व्हिडीओ
राज ठाकरे यांनी गंगा प्रदूषणाचा एक मिनिटांचा व्हिडिओ यावेळी दाखवला. त्या व्हिडिओत गंगेवर प्रेत जाळताना दिसत आहे. राख दिसत आहे. प्रेत नेली जात आहेत. गंगा नदीत दुषित पाणी सोडले जात आहे. कचरा टाकला जात आहे. जनावरे मेलेली दिसत आहे. त्यांनी मुंबईतील नद्यांची परिस्थितीही दाखवली. महाकुंभात ६५ कोटी लोक म्हणजे अर्धा भारत आला. चला तर व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी सोडू. बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला. महाराष्ट्रातील नद्यांची परिस्थिती हीच आहे. कोकणातील सावित्री नदी केमिकलने भरली आहे. देशभरात ३११ नदी पट्टे आहे. ते प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर आहे. महाराष्ट्रातील यातील ५५ नदी पट्टे प्रदूषित आहेत. मुंबईत पाच नद्या होत्या. त्यातील चार नद्या मेल्या. पाचवी मिठी नदी मरायला आली, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
छावा चित्रपटावरही बोलले
राज ठाकरे यांनी निवडणुकीवरही भाष्य केले. ते म्हणाले, मला बरंच बोलायचं आहे. निवडणुका झाल्यावर अनेक विषय झाले. अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे अनेक फोनही आले. नेमके आजच मला फोन आले. आज का आले याचे अर्थ मला समजतो. जरा जपून, असा खोचक टोला यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे. छावा चित्रपटानंतर राज्यात निर्माण झालेल्या वादावरुन राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरातून उतरला की हे सर्व उतरले. छत्रपती संभाजी महाराजाचे बलिदान तुम्हाला आता कळले का? विकी कौशलमुळे संभाजी महाराज समजले का? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअपवर इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोके घालावे लागते.
ते म्हणाले, सध्या कुणीही इतिहासावर बोलतो. विधानसभेतही इतिहासावर बोलतात. औरंगजेबावर बोलतात. इतिहासातून जातीपातीत भिडवणे सोपे आहे. त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. त्यांना संभाजी राजांशी काहीच कर्तव्य नाही आणि औरंगजेबाशी काही कर्तव्य नाही. तुमची माथी फक्त भडकवायची आहे.