सोने आणि महिलावर्ग हे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. सोन्याची गोष्ट सुरु तर महिलांना रहावत नाही. मात्र गेल्या वर्षभरापासून वाढलेले सोन्याचे दर, पाहता सोने महिलांच्या हाताबाहेर चाललेले दिसू लागले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गुढीपाडव्या मुहूर्तावर नगरच्या बाजारपेठेत सोन्याने उच्चांकी ९२ हजार रुपये प्रती तोळ्याचा दर गाठला. रविवारी पाडवा सण असतांना नगरच्या सुवर्ण बाजारपेठे ग्राहकांनी मोजकीच खरेदी केली. सोन्याचे दर असेच वाढलेले राहिले तर, सोने खरेदी बाजारपेठेवर परिणाम होईल, अशी शक्यता सुवर्णकारांनी व्यक्त केली आहे.
पाडव्याला इतर खरेदी
पाडव्याला सोने ९२ हजारांच्यावर गेले. त्यानंतर पाडव्याला नगरकरांनी इतर वस्तू खरेदी करण्यावर भर दिला. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. त्यामुळे या दिवशी काही ना काही खरेदी केली जाते. मात्र यावेळी नगरकरांनी सोन्याऐवजी मोबाईल, टीव्ही, दुचाकी, चारचाकी किंवा अन्य मौलव्याने वस्तूंच्या खरेदीला पसंती दिली. घरोघरी नागरिकांनी आनंदाची गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यंदा चैत्रारंभापूर्वीच महागाईचा पारा तापला असला तरी मुहूर्ताची खरेदी म्हणून ग्राहकांचे घर, वाहन, गॅझेट्स वा विद्युत उपकरणे तसेच सोने-चांदीसारख्या मैल्यवान धातूबाबतचे आकर्षण यंदाही होते.
स्मार्टफोनची खरेदी वाढली
सध्या पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा बाजार मंदावलेला दिसला. सोन्याऐवजी इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ झटकून खरेदीच्या माध्यमातून वसंत ऋतूच्या आगमनाला ग्राहकवर्ग सज्ज असल्याचे काल दिसून आला. कार शोरूम, दुचाकी शोरुम केंद्रांवर ग्राहकांची गर्दी होती. कंपन्यांनी विविध प्रकारच्या सूट योजना जाहीर केल्या, यात फ्री इन्शुरन्स, एक्स्चेंज बोनस आणि झिरो डाऊन पेमेंटसारख्या लाभामुळे खरेदीत वाढ होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मोबाइल, लॅपटॉपप्रेमी ग्राहकांसाठी गुढीपाडवा हा नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, इयर इक्विपमेंट, स्मार्ट टीव्ही, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्याचा उत्तम दिवस मानला जातो.
फ्रीजनेही खाल्ला भाव
उन्हाचा हंगाम पाहता एसी, फ्रीजसाठीही ग्राहकांकडून चाचपणी सुरू होती. अनेकांनी मुहुर्तावर विविध खरेदी केली. यंदा फ्रीज, पंखे, कुलर यांच्या विविध कंपन्यांनी विविध ऑफर्स दिल्या होत्या. त्या ऑफर्सचा फायदा ग्राहकांनी घेतला. या सगळ्या वस्तूंची चांगली खरेदी विक्री झाल्याचे पहायला मिळाले. अजून एप्रिल व मे हे दोन महिने असल्याने, थंडावा देणाऱ्या वस्तूंना अजूनही चांगली बाजारपेठ राहील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.